पुन्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार ‘द कपिल शर्मा शो’


‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ असो किंवा सध्या सुरु असलेला ‘द कपिल शर्मा शो’ असो, प्रत्येक शोच्या माध्यमातून विनोदवीर कपिल शर्मा याने कायमच चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणत आपली वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे. पण हा विनोदवीर आता काही काळासाठी चाहत्यांचा निरोप घेणार आहे.

येत्या काही दिवसांत द कपिल शर्मा शो हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. जरी हा कार्यक्रम पुढील महिन्यात बंद होणार असला तरी यामागची कारणे चर्चेचा विषय ठरत आहेत. अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणानंतर निर्मिती संस्था आणि वाहिनीने हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल शर्माच्या सूत्रसंचालनात साकारला जाणाऱ्या या कार्यक्रमातून किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, अर्चना पूरण सिंह असे कलाकारही झळकतात. पण, फेब्रुवारी महिन्यापासून हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. 2018 मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाला दमदार कामगिरीनंतर आता काही काळासाठी अल्पविराम मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला एवढ्यातच कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा कोणताही बेत ठरलेला नाही. कपिलच्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणे होती. प्रेक्षकांचा सहभाग हा घटकही कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत होता. सध्या कोरोनामुळे प्रेक्षकांची उपस्थिती लाईव्ह कार्यक्रमात नाही, चित्रपटही बेतानेच प्रदर्शित केले जात असल्यामुळे कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती कमीच असल्यामुळे आता कार्यक्रमाला अल्पविराम देत काही काळानंतर परिस्थिती पूर्ववत आल्यानंतरच पुन्हा कार्यक्रम सुरु करण्याचा विचार केला जाईल. काही काळासाठी का असेना, पण कपिल शर्मा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे चाहत्यांध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.