तामिळनाडूचे भविष्य नागपुरमधील ‘निकरवाले’ कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी


धारमपुर – भारताचा पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही नष्ट करू देणार नाही. हे त्यांना समजत नाही की केवळ तामीळ जनताच तामिळनाडूचे भविष्य ठरवू शकते. तामिळनाडूचे भविष्य नागपुरचे ‘निकरवाले’ कधीच ठरवू शकत नसल्याचे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भर सभेतून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला.

मे महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. काँग्रेसकडून या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरण देखील हळूहळू तापायला सुरूवात झाली आहे. सध्या तामिळनाडू दौऱ्यावर राहुल गांधी असून, ते विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी धारमपुर येथील एका सभेत बोलताना मन की बात कार्यक्रमावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला, तामिळनाडूमध्ये असे सरकार हवे की जे लोकांच्या समस्या सोडवेल, ना की स्वतःची मन की बात जनतेवर थोपवेल. तसेच, भारताचे अधःपतन पंतप्रधान मोदींच्या राजकारणाने होत आहे, हे आता आपल्याला थांबवायला हवे. भारताचा पायाच मोदींना नष्ट करायचा आहे. पण आपण सर्वजण मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढा देऊ, असे आवाहन देखील राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील जनतेला केले आहे.

तसेच, मी तुम्हाला हे सांगायला येथे आलेलो नाही की, तुम्हाला काय करायचे आहे. तुमच्याशी मन की बात करण्यास देखील मी आलेलो नाही. मी येथे तुम्हाला ऐकण्यासाठी आलो आहे. तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहे व त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलो असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.