मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार उतरले शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ


मुंबई – राजभवनवर मोर्चासाठी शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक रविवारी मुंबईत दाखल झाले असून आज सकाळपासूनच आझाद मैदानात या मोर्चातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी या मोर्चामधील जाहीर सभेत सहभागी होणार आहेत. पण आता मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटवरील दुकानादारांनाही या मोर्चाला पाठिंबा दर्शवत आज दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून मुंबईत रविवारी संध्याकाळी दाखल झाले. हा मोर्चा शनिवारी वाहनांमधून नाशिकहून मार्गस्थ झाला होता. इगतपुरीत मुक्काम केल्यावर रविवारी सकाळी घाटनादेवी येथून कसाऱ्यापर्यंत आंदोलक पायी आले. सुमारे तीन तासात घाट उतरून खाली आल्यावर वाहनांमधून मोर्चेकरी मुंबईकडे रवाना झाले. ठाणे शहर व मुंबईत मोर्चाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी वाहनांमधून मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाले. आझाद मैदानात हे मोर्चेकरी दाखल झाल्यापासून त्यांना सर्वच स्तरांमधून पाठिंबा दिला जात आहे.

या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानालाच लागून असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील जवळजवळ सर्वच दुकानदारांनी आज दुकाने बंद ठेवण्याचे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे. आज आझाद मैदानला लागू असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद ठेऊन मोर्चातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. शेतकऱ्यांचीच आम्ही सुद्धा लेकरे असून शेतकऱ्यांचा विरोध असणारे हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे फॅशन स्ट्रीटवरील दुकानादार सांगतात. केवळ भूमिका घेत पाठिंबा न देता तो कृतीमधून दर्शवण्यासाठी आज सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील दुकानदारांनी घेतला आहे.

रविवारी संध्याकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने मोर्चासाठी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली. परिणामी, आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पालिकेने मोर्चा लक्षात घेऊन स्वच्छतेसाठी सफाई कामगार, पिण्यासाठी पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटपही सुरू केले. मोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पालिकेने आझाद मैदान परिसरात वैद्यकीय शिबिराची व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास कोरोना चाचणीही करण्यात येत आहे, असे ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.