Thar गिफ्ट देणाऱ्या महिंद्रांना मराठमोळ्या शार्दुलचा रिप्लाय


उद्योगपती आनंद महिंद्रा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाचे पाणी पाजणाऱ्या टीम इंडियातील सहा तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर भलतेच खूश झाले आणि या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची त्यांनी घोषणा केली. आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना आपल्या कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR गिफ्ट म्हणून देत असल्याचे जाहीर केले. महिंद्रांनी मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदिप सैनी या सहा खेळाडूंना थार गिफ्ट केली. ही एसयूव्ही टीम इंडियाच्या तरुण खेळाडूंना गिफ्ट करताना मला खूप आनंद होत असल्याचे महिंद्रा म्हणाले.

विशेष म्हणजे स्वतःच्या पैशातून ही दमदार एसयूव्ही आनंद महिंद्रा देणार आहेत. कंपनीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील भविष्यातील तरुण पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची प्रेरणा या तरुण खेळाडूंनी दिली आहे. त्यांचे मनोबल वाढावे म्हणून थार एसयूव्ही गिफ्ट केल्याचे महिंद्रांनी ट्विटरद्वारे सांगितले.

महिंद्रा कंपनीची THAR ही ऑफ रोडर एसयूव्ही असून भारतात लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये या गाडीची चांगलीच डिमांड आहे. भारतात या गाडीची किती मागणी आहे हे यावरुनच लक्षात येते की, गाडी घरी नेण्यासाठी बूक केलेल्यांनाही अनेक महिने वाट बघावी लागत आहे. दरम्यान, भारताच्या उद्योग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या आनंद महिंद्रांकडून एवढे ढासू गिफ्ट मिळाल्याने मराठमोळा शार्दुल ठाकूरही भलताच खूश झाला आहे.

आनंद महिंद्रांच्या ट्विटला रिप्लाय देताना शार्दुलने थार गिफ्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. थँक्यू सर… तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणे हिच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे….तुमच्याकडून आलेले गिफ्ट सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे….तुम्ही जसे म्हणता त्याप्रमाणे अशक्य गोष्टी धुंडाळल्या पाहिजेत. तुम्ही दिलेल्या या गिफ्टसाठी मी आभारी असल्याचे शार्दूलने म्हटले आहे.