
मुंबई – देशातील शेतकरी केंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीनही कायद्यांना विरोध करत रस्त्यावर उतरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची तमा न बाळगता, हे कायदे मागे घेण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरीही दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. या शेतकरी आंदोलकांची राजभवनावर जाण्याची इच्छा आहे.
…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार – विश्वास नांगरे पाटील
मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यासंदर्भात बोलताना म्हणाले, दक्षिण मुंबईत मोर्चाला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देता येत नाही. आम्ही यासंदर्भात मोर्चाशी संबंधित शिष्टमंडळ आणि नेतेमंडळींची भेट घेतली आहे. त्यांना समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. पण, शेतकऱ्यांचा राजभवनावर जाण्याचा आग्रह आहे. राजभवनाकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे शिष्टमंडळ राजभवनापर्यंत घेऊन जाऊ, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.
दक्षिण मुंबईत शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर 800च्यावर पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आंदोलक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच फेस मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग पाळावे. यासंदर्भात आम्हीही वारंवार आंदोलक शेतकऱ्यांना सूचना देत असल्याचेही नांगरे पाटील यांनी सांगितले.
