अखेर पंकजा मुंडेंनी सोडले धनंजय मुंडे प्रकरणी मौन


औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे चर्चेत होते. भाजप नेत्यांकडून धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेली संबंधांची कबुली यामुळे निशाणा साधत, वारंवार राजीनाम्याची मागणी करत होते. तर दुसरीकडे पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यत वाट पाहण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. त्यातच तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला असून विरोधकही शांत झाले आहेत. पण भाजप नेते एकीकडे टीका करत असताना या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते. पण त्यांनी यावर अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. त्यांना यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्या त्यावेळी म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही, अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो.

महिला बालकल्याण मंत्री म्हणून मी काम पाहिले आहे. एक नाते आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. जरी हा विषय कोणाचा असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसते आणि आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका मांडली. संसदेत प्रीतम मुंडे यांनीदेखील आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊले सकारात्मक पडली पाहिजेत. जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे. याच्यात प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मी सध्या राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यामुळे माझ्या अनेक भूमिका, मुद्दे राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी हिंदी भाषा वापरते, काल पहिल्यांदा वापरली नाही. मी जेव्हापासून राष्ट्रीय सचिव झाले तेव्हापासून बऱ्याच शुभेच्छा आणि मते हिंदीत व्यक्त करत असते, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

ओबीसीच्या एकमेव मुख्यमंत्री तुम्ही होणार का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, यापासून मला थोडे दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचे ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.