धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात अजित पवारांची आक्रमक भूमिका


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून यावरुन विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. कोणाला किती मुले आणि कोणाची किती लग्न झाली होते सांगू का? अशी विचारणा केली आहे.

या विरोधकांना आता काय म्हणावे, एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचे आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नसल्याच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जे काही धनंजय मुंडे यांना सांगायचे होते ते त्यांनी सांगितले आहे. मग जर रेकॉर्ड पहायचे झाले तर अनेकांनी काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुले होती आणि कोणाची किती लग्न झाली आणि कोणाचे लग्न झाले नव्हते. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता, असे अजित पवार म्हणाले.