सुती कपडा खरेदी करताना घ्या ही खबरदारी

cotton
आजच्या काळामध्ये कृत्रिम धाग्यांचा वापर करून बनलेल्या कपड्याच्या मानाने सुती किंवा कॉटनचा कपडा अधिक वापरला जाऊ लागला आहे. एकतर नैसर्गिक धाग्यामधून याचे निर्माण केले जात असल्याने यापासून शरीराला, त्वचेला कोणत्याही प्रकारचा अपाय नाही, आणि त्याशिवाय हा कपडा उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवरील घाम अवशोषित करून त्वचेला थंडावा देणारा आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ऊब देणारा असा हा कपडा आहे. त्यामुळे या कपड्याला केवळ आपल्या देशामध्येच नाही, तर विदेशांतही मोठी मागणी आहे. पण आजकाल सुती कपड्याच्या नावाखाली अनेकदा मिश्र धाग्यांचा वापर करून बनविलेल्या, कमी दर्जाच्या कापडाची विक्री सर्रास केली जात असते. त्यामुळे चांगल्या प्रतीचा सुती कपडा ओळखता यावा, या करिता काही गोष्टी लक्षात घेणे आवश्याक आहे.
cotton1
कॉटनचा कपडा ओळखण्यासाठी त्या कपड्यातील एक लहानसा तुकडा वेगळा कापून घ्यावा. या तुकड्यावर निरनिराळे प्रयोग करून कपडा संपूर्णपणे सुती आहे किंवा त्यामध्ये इतर कृत्रीम धागे मिसळलेले आहेत, हे तपासून पाहता येणे शक्य होते. सर्वात प्रथम हा तुकडा हाताने फाडायचा प्रयत्न करावा. जर कापडामध्ये सुतासोबत इतर कृत्रीम धागे मिसळलेले असतील, तर हा तुकडा सहजी फाटणार नाही. तसेच हा तुकडा जर जाळून पहिला, आणि जळत असताना या कपड्यामध्ये गाठी निर्माण होताना दिसल्या, तर यामध्ये कृत्रिम धागे मिसळले आहेत असे समजावे. तसेच कॉटनचा कपडा जाळल्यास तो संपूर्णपणे जाळून त्याची राख होते. मात्र कृत्रिम धागे मिसळले असल्यास त्यांमध्ये गाठी निर्माण होऊन त्या गाठी जळत नाहीत. अश्या प्रकारे कपडा सुती आहे किंवा नाही, याची पडताळणी करून पाहता येते.

Leave a Comment