अशी आहे झपाटलेल्या अॅनाबेलची भीतीदायक कहाणी

DOLL
अॅनाबेल या बाहुलीची कथा सत्यकथा आहे असे म्हटले जाते. ही बाहुली आजही अमेरिकेतील एका खासगी संग्रहालयामध्ये अस्तित्वात आहे. या बाहुलीवर आधारित हॉलीवूड चित्रपट ‘अॅनाबेल क्रिएशन’ अतिशय लोकप्रिय ठरला होता. पण या चित्रपटातील कथानक आणि या बाहुलीच्या कहाणीमध्ये फारसे साम्य नसल्याचे म्हटले जाते. या बाहुली बद्दल बोलायचे झाले तर ही बाहुली आपल्या संग्रही ठेवण्यास कोणीही धजाविले नाही, कारण ही बाहुली जिवंत मनुष्य असल्याप्रमाणे वागते असे म्हटले जाते. आणखी एक हॉलीवूड चित्रपट ‘द कॉन्ज्यूरिंग’ मध्येही या बाहुलीचा उल्लेख आलेला आहे.
DOLL1
अमेरिकन कथा लेखक जॉनी गृएल यांनी सर्वप्रथम आपल्या एका कथेमध्ये या बाहुलीचा उल्लेख केला होता. ही बाहुली त्याच्या आयुष्यामध्ये नेमकी कशी आली, ही घटना देखील काहीशी रहस्यमय आहे. ही बाहुली जॉनीच्या घरामध्ये नेमकी कुठून आली, हे आजवर न उकललेले गूढ आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा जॉनी लहान मुलांसाठी एका कथा संग्रहाची रचना करीत होते. या कथा संग्रहाच्या सोबतच ‘अॅनाबेल’ ही बाहुली देखील मुलांना आकर्षित करण्या करिता मार्केटमध्ये आणली गेली. त्यांच्या कथासंग्रहाबद्दल लोकांना विलक्षण कुतूहल होते. या बाहुलीचा उल्लेखही या कथासंग्रहामध्ये असल्याने तिच्या विषयी अधिक जाणून घेण्याचा उत्साह लोकांमध्ये होता.
DOLL2
जॉनीची मुलगी मार्सेला देखील या बाहुलीशी नेहमी खेळत असे. जेव्हा मार्सेला ला या बाहुलीशी खेळताना जॉनीने पाहिले तेव्हा त्यांना आपला कथा संग्रह लिहिण्याची कल्पना सुचली. पण यानंतर जॉनीच्या आयुष्यामध्ये मोठी दु:खदायी घटना घडली. त्यांची मुलगी मार्सेला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी मरण पावली. मार्सेलाच्या मृत्यूनंतर जेव्हा जॉनीने लिहिलेला कथा संग्रह प्रसिद्ध झाला, तेव्हा त्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर अॅनाबेलचे चित्र होते. मार्सेलाच्या आठवणी जपण्यासाठी, तिला श्रद्धांजली म्हणून जॉनीने हा कथासंग्रह प्रकाशित केला. इथवर सगळे ठीकच चालू होते. त्यानंतर मात्र एक एक करून विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. मार्सेलाच्या मृत्यूनन्तर एक दिवस अॅनाबेलही घरातून अचानक नाहीशी झाली. ज्याप्रमाणे एक दिवस अचानक ही बाहुली जॉनीच्या घरामध्ये आली, तशीच अचानक ती नाहीशी देखील झाली. त्या बाहुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न जॉनीने केला, पण बाहुलीचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.
DOLL3
त्यानंतर काही दिवसांनी ही बाहुली एका अँटिक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये, नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या डोना नामक तरुणीच्या आईला दिसली. तिथे ती बाहुली कशी पोहोचली याचा उल्लेखही कुठे आढळत नाही. डोनाच्या आईला ती बाहुली आवडल्याने तिने ती आपल्या मुलीला भेट म्हणून दिली. सुरुवातीला इतकी सुंदर बाहुली पाहून डोनाला झालेला आनंद फार काळ टिकला नाही. बाहुली घरात आल्यानंतर डोनाच्या घरामध्ये चित्रविचित्र घटना घडू लागल्या. कधी ज्या ठिकाणी बाहुली ठेवली असेल, तिथून ती आपोपाप दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असे, तर कधी बाहुलीच्या हातांवर रक्तासारखे लाल डाग असत. हे पाहून डोना चांगलीच भयभीत झाली, आणि या बाहुलीचे रहस्य नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिने पॅरानॉर्मल एक्स्पर्ट्स एड वॉरेन आणि त्याची पत्नी लोरेन वॉरेन यांना पाचारण केले.
DOLL4
वॉरेन दाम्पत्याने ही बाहुली झपाटलेली असल्याचे सांगताच डोना आणखीनच घाबरून गेली. तिची ही भीती पाहून वॉरेन दाम्पत्याने ही बाहुली आपल्यासोबत नेऊन तिला त्यांच्या खासगी ‘ऑकल्ट म्युझियम’ मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ते आपल्यासोबत ही बाहुली गाडीमधून घेऊन जात असताना बाहुलीने त्यांना सर्वतोपरी अडविण्याचा प्रयत्न सुरु केला. मोठ्या मुश्कीलीनेच वॉरेन दाम्पत्य कसेबसे म्युझियममध्ये पोहोचले. त्यानंतर पवित्र मंत्रांचे उच्चारण करीत त्यांनी ती बाहुली एका काचेच्या कपाटामध्ये कुलुपबंद करून टाकली. तेव्हापासून ही बाहुली त्या संग्रहालयामध्येच आहे. या बाहुलीमध्ये आजही नकारात्मक शक्ती जागृत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या बाहुलीच्या जवळ जाण्याची किंवा तिला स्पर्श करण्याची परवानगी दिली जात नाही.

Leave a Comment