घरच्या घरी तपासा दुधाची शुद्धता

milk
आजच्या काळामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, हे नित्याचेच झाले आहे. ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जात असते, की कोणता पदार्थ अगदी खात्रीशीरपणे शुद्ध असेल, आणि कोणता पदार्थ भेसळयुक्त असेल, हे छातीठोकपणे सांगता येणे कठीणच आहे. लहान मुलांपासून वयस्क मंडळींपर्यंत सर्वाच्याच आरोग्यासाठी उत्तम असा एक पदार्थ म्हणजे दुध. पण आजच्या काळामध्ये दुधामध्ये भेसळ असणे ही देखील सामान्य बाब झाली आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्यापासून ते थेट युरिया, स्टार्च, इथपर्यंत सर्व वस्तू दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुध पुरविले जाण्याच्या किती तरी घटना नेमाने घडत असतात. असे भेसळयुक्त दुध आरोग्याच्या दृष्टीने किती घातक ठरू शकते याची कल्पना आपण करू शकतो. असे भेसळयुक्त दुध आपल्या घरी तर येत नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी काही प्राथमिक चाचण्या आपण घरच्याघरी करून पाहू शकतो. त्याद्वारे जर दुध भेसळयुक्त असल्याची शंका आली, तर मग दुधाचे सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्याची सविस्तर तपासणी करवून घेणे ही पुढली पायरी आहे.
milk1
दुधामध्ये पुष्कळदा स्टार्च मिसळला जातो. दुध स्टार्च युक्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी थोडेसे दुध एका वाटीमध्ये काढून घेऊन त्यामध्ये दोन चमचे मीठ मिसळावे. जर दुधामध्ये स्टार्च नसेल तर दुधाचा रंग बदलणार नाही. मात्र दुधामध्ये स्टार्च असेल, तर दुधाचा रंग निळा होईल. दुधामध्ये कॉस्टिक सोडा घालूनही भेसळ करण्याची पद्धत सामान्य आहे. याची तपसणी करण्यासाठी थोडे दुध एक लहान काचेच्या बरणीत घालावे आणि झाकण लावून बरणी जोरजोराने हलवावी. असे केल्यांनतर जर वाजवीपेक्षा जास्त फेस दुधावर आला, आणि पुष्कळ वेळ तसाच राहिला, तर त्यामध्ये वॉशिंग सोडा असू शकतो.
milk2
पॅकेज्ड दुध जास्त काळ टिकून राहावे या करिता त्यामध्ये फॉर्मालीन मिसळले जाते. हा पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकतो. दुधामध्ये फॉर्मालीन आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी शक्यतो तज्ञांची मदत घ्यावी, कारण ही तपासणी करण्याकरिता वापरले जाणारे रसायन अतिशय काळजीपूर्वक वापरले जाणे आवश्यक आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एका लहानशा वाटीमध्ये थोडेसे दुध काढून घेऊन त्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक रित्या दहा मिलीलीटर सल्फ्युरिक अॅसिड घालावे. जर दुधामध्ये फॉर्मालीनची भेसळ असेल तर दुधावर निळसर छटा दिसून येईल.
milk3
अनेकदा दुधामध्ये डालडा किंवा वनस्पती तूप मिसळले जात असते. हायड्रोक्लोरिक अॅसिडच्या मदतीने ही भेसळ तपासता येऊ शकते. ही तपासणी करण्याकरिताही तज्ञांची मदत घेणे योग्य ठरेल. भेसळ तपासण्यासाठी दोन चमचे हायड्रोक्लोरिक अॅसिड, एक चमचा साखर आणि एक चमचा दुध असे पदार्थ एकत्र मिसळावेत. जर दुधामध्ये डालडा किंवा वनस्पती तुपाची भेसळ असेल, तर हे मिश्रण लालसर रंगाचे दिसून येईल. अश्या रीतीने दुधातील भेसळ ओळखता येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment