हार्मोन्सचे संतुलन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक

mental
मनुष्याची आनंदी, समाधानी मनस्थिती ही मुख्यत्वे चार हार्मोन्सवर अवलंबून असते. एन्डोर्फिन्स, डोपामाइन, सेरोटोनीन आणि ऑक्सिटॉक्सीन. या हार्मोन्सचे कार्य समजून घेणे अगत्याचे आहे, कारण आनंदी, समाधानी मनस्थिती करिता हे चारही हार्मोन्स संतुलित असणे आवश्यक असते. त्यामुळे या चारही हार्मोन्सबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

एंडोर्फिन्स नामक हार्मोन्स जेव्हा आपण शारीरिक श्रम करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये सक्रीय होत असतात. या हार्मोन्समुळे शारीरिक श्रम करताना होणारा त्रास किंवा वेदना सहन करण्याची ताकद शरीरामध्ये निर्माण होते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर वेदना होत असल्या तरी आपल्याला ताजेतवाने वाटते, तसेच शरीरामध्ये चैतन्य, उत्साह निर्माण होतो. मनापासून हसल्याने शरीरावरील आणि मनावरील ताण कमी होतो हे आपण नेहमी अनुभवतो. याचे कारण म्हणजे हसण्याच्या क्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन्स सक्रीय होत असतात, म्हणूनच अगदी दिलखुलास हसल्याने मनावरील ताण हलका होऊन, मन आनंदी होते. एखादा विनोदी सिनेमा पाहिला किंवा काही विनोदी साहित्य वाचले की मनावरील ताण कमी होण्यामागे शरीरामध्ये सक्रीय होणारे एंडोर्फिन्स हे कारण आहे.
mental1
आपल्या आयुष्यातील आपण साध्य केलेली लहान मोठी ध्येये, किंवा यशस्वीपणे पार पाडलेल्या जबाबदाऱ्या आपल्या मनाला आनंदाची व समाधानाची जाणीव करून देणाऱ्या असतात. ही आनंदाची किंवा सानाधनाची भावना जागृत होण्यामागे डोपामाईन हा हार्मोन आहे. कोणी आपली प्रशंसा केली, किंवा आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले की आपल्या शरीरामध्ये डोपामाईन हार्मोन सक्रीय होऊ लागतो. या हार्मोन मुळे आपले मन आनंदी राहते. सरोटोनीन हा हार्मोन आपण इतरांसाठी काही केल्याने समाधान मिळाले, की सक्रीय होणारा आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहिल्याने मनाला जी शांतता, आनंद मिळतो त्यासाठी देखील सेरोटोनीन हा हार्मोन जबाबदार आहे. त्यामुळे इतरांना मदत केल्याने आपल्याला मिळणारा आनंद आणि निसर्गाच्या सान्निध्यात, शहरातील गोंगाटापासून लांब गेल्याने मनाला मिळणारी विश्रांती सेरोटोनीनमुळे आपल्याला अनुभवता येते.

निसर्गाच्या सान्निध्यात असताना आपल्याला आनंद समाधान मिळतेच, पण आपल्यासोबत आपली जवळची मित्रमंडळी किंवा परिवारजन असले, की हा आनंद द्विगुणीत होतो. आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवल्याने, त्यांना आपल्या मनातील विचार बोलून दाखविल्याने मनाला जो आनंद मिळतो, तो शरीरामध्ये ऑक्सिटॉक्सीन नामक हार्मोन सक्रीय झाल्यामुळे असतो. लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी देखील त्यांच्या आवडत्या माणसांनी प्रेमाने केलेला स्पर्श ऑक्सिटॉक्सीन सक्रीय करणारा आहे. म्हणूनच आपल्या आवडत्या माणसाचा स्पर्श होताच मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment