ईडीने केली हितेंद्र ठाकुर यांच्या पुतण्या आणि सीएला अटक


वसई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर छापा टाकला होता. ईडीने आज सकाळी ठाकूर यांचा पुतण्या मेहुल ठाकूर आणि संचालक सीए मदन चतुर्वेदी यांना अटक केली आहे.

ठाकूर कुटुंबियांचे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी आर्थिक संबंध असून, या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यावधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून त्यांच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. दरम्यान, ईडीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची सुत्रांची माहिती आहे

दरम्यान, एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रवीण राऊत हा माजी संचालक आहे. राऊतने ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यातील ५५ लाख पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिले होते. त्यानुसार वर्षा यांच्याकडेही ईडीने चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ते पैसे परत केले.

ईडीचे अधिकारी आले असून ते चौकशी करतील. अद्याप माझ्यापर्यंत कोणीही आलेले नाही. ते त्यांचे काम करत आहेत. नाव कशातही येऊ द्या. जे काही व्यवहार आहेत त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ, असे ठाकूर यांनी सांगितले होते.