भाजप आमदार प्रसाद लाड ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला !


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज निवास्थानी जाऊन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड पोहोचल्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चवितर्कांना उधाण आले आहे.

आपल्या तक्रारी घेऊन अनेक जण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे कृष्णकुंज या निवास्थानी येत असतात. भाजप आमदार प्रसाद लाड हे आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण भेटीबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. प्रसाद लाडच नाहीतर याआधी सुद्धा भाजपचे आमदार आशिष शेलार, विनोद तावडे यांनी वेळोवेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले होते.

प्रसाद लाड यांना काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावल्यामुळे प्रसाद लाड यांची चौकशी होणार अशी शक्यता आहे. प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महापालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लाड हे मानले जातात. त्यातच आता लाड हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.