‘सीरम’मधील दुर्घटनेचे सत्य चौकशीतून समोर येईल – मुख्यमंत्री


पुणे : कोरोनावर लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला काल भीषण आग लागली होती. आज घटनास्थळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. सीरमध्ये संस्थेला आग लागली की घातपात आहे, हे चौकशीतून समोर येईल, असे महत्त्वाचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह आग लागलेल्या संकुलास भेट दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली.

कोव्हीशिल्ड लसींचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असून लसीवर आगीचा काहीही परिणाम झालेला नाही. आगीची चौकशी करण्यात येत आहे. पूर्ण होईस्तोवर कोणतेही भाष्य करणे योग्य होणार नाही, अपघात की घातपात ते नंतरच कळेल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबादारी कंपनीने घेतली आहे. परंतु, आणखीही त्यांच्यासाठी काही करता येण्यासारखे असेल तर सरकार नक्की करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.