हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी बनणार एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री


हरिद्वार – अनिल कपूर ‘नायक’ या चित्रपटामध्ये जसा एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो, त्याचप्रकारे उत्तराखंडमधील एका मुलीला ही संधी २४ जानेवारी रोजी मिळणार आहे. हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे. राष्ट्रीय कन्या दिन २४ जानेवारी रोजी असल्यामुळे त्यादिवशी बाल मुख्यमंत्री म्हणून एक दिवसासाठी ती पदभार ग्रहण करणार आहे. त्यानंतर सर्व विभागीय अधिकारी सृष्टी गोस्वामीसमोर त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सादर करतील. याबाबत उत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात लिहिले आहे की, युवतींच्या सशक्तीकरणासाठी आयोगाने एका हुशार मुलीला एका दिवसासाठी २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचसोबत उत्तराखंडच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचा मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामी आढावा घेणार आहे. विभागाचे अधिकारी त्यासाठी आपल्या कार्याचा अहवाल ५ मिनिटे बाल विधानसभेत देतील. बाल विधानसभेचे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत याचे आयोजन करण्यात आले आहे.

दौलतपूरची सृष्टी गोस्वामी रहिवासी आहे. ती रुडकीच्या बीएमएम पीजी कॉलेजमधून बीएससी एग्रीकल्चरची विद्यार्थी आहे. दर ३ वर्षाने बाल विधानसभेत बाल मुख्यमंत्र्याची निवड केली जाते, यासाठी सृष्टी गोस्वामीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने ज्यात या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले आहेत. सृष्टीच्या आई-वडिलांनी या निवडीबद्दल सांगितले की, आम्हाला अभिमान वाटतो, मुलीला साथ दिली तर ती यशाचे शिखर नक्की जिंकेल, आम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे सृष्टी गोस्वामी २४ जानेवारी रोजी एका दिवसासाठी मुख्यमंत्री होणार आहे, बाल विधानसभेची बैठक उत्तराखंड विधानसभेत १२० नंबरच्या खोलीत आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी यासाठी मान्यता आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत