राज्यात ठाकरे अन् पवारांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; किरीट सोमय्यांचा आरोप


नवी दिल्ली : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांआधी रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. पण आता धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. ठाकरे आणि पवारांचा महाराष्ट्रात ऐवढा दबाव आहे की, त्यांच्या विरोधात कोणाही बोलू शकत नाही. त्यांनी माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचेही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरीही धनंजय मुंडेंनी दूसऱ्या विवाहाची माहिती लपवली असल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला यांचे स्पष्टीकरण द्यावच लागेल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. सध्या दिल्लीमध्ये किरीट सोमय्या असून त्यांनी दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाचीही भेट घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.