भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन


आज दीर्घआजाराने ‘चलो बुलावा आया है…’ या लोकप्रिय गीताचे गायक आणि भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. आज दुपारी दिल्लीच्या अपोलो रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना अपोलो रूग्णालयात वृद्धापकाळामुळे आलेल्या अशक्तपणामुळे भरती करण्यात आले होते. या रूग्णालयात त्यांच्यावर दोन महिन्यांपासून उपचार सुरु होते. त्यांची प्राणज्योत आज मालवली. सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र चंचल यांचे निधन झाल्याची माहिती गायक दलेर मेहेंदी यांनी दिली आहे.

कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नरेंद्र चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लोकप्रिय भजन सम्राट नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. या दु:खात त्यांचे कुटुंब व चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

अमृतसरच्या नमक हांडी येथे 16 ऑक्टोबर 1940 साली जन्मलेल्या नरेंद्र चंचल यांना अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळाले होते. बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली होती. त्यांनी गायलेले ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. नरेंद्र चंचल यांना यासाठी फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार सुद्धा मिळाला होता. पण त्यांना खरी ओळख दिली ती ‘चलो बुलावा आया है’ या ‘अवतार’ या चित्रपटातील गाण्याने.
बॉबीनंतर नरेंद्र चंचल यांनी बेनाम आणि रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठी गाणी गायली. मोहम्मद रफी यांच्यासोबत 1980 मध्ये ‘तूने मुझे बुलाया शेरा वालिए’ हे त्यांनी गायलेले गाणेही लोकप्रिय झाले होते. नरेंद्र चंचल वैष्णोदेवीचे खूप मोठे भक्त होते. दरवर्षी न चुकता 29 डिसेंबरला ते वैष्णोदेवीला जात आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी परफॉर्मही करत.