YouTube ने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला झटका


वॉशिंग्टन – बायडन पर्व अमेरिकेच्या सत्ताकारणात सुरु झाले असून 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही घातलेली बंदी सोशल मीडिया कंपन्या काही लगेचच हटवण्याची चिन्ह नाही. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी अजून वाढवल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या युट्यूबने जाहीर केले आहे.

अजून एका आठवड्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी वाढवत असल्याचे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. YouTube ने जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाआधीच ट्रम्प यांच्यावरील ही बंदी वाढवली. अजून किमान सात दिवस नवीन व्हिडिओ किंवा थेट प्रवाह ट्रम्प यांच्या चॅनलवर अपलोड करण्यास बंदी असेल, असे कंपनीने म्हटले आहे. युट्यूबने काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली होती. यूट्यूबने ही कारवाई ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत केली होती.

ट्रम्प यांना कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या बॅन करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना Snapchat नेही कायमस्वरुपी बॅन केले आहे. याशिवाय स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. तर, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे. कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत.