…यामुळे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत केला महात्मा गांधींचा पुतळा


नवी दिल्ली : नुकताच संसदेच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ असणारा महात्मा गांधी यांचा पुतळा नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी तात्पुरता हटवून तिसऱ्या क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापन करण्यात आला आहे. हा पितळेचा पुतळा 16 फूट उंचीचा असून, हा शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे राम सुतार यांनीच डिझाइन केले आहे. 1993 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले होते.

तात्पुरते पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आल्याचे राज्यसभा सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार महात्मा गांधी यांच्या या पुतळ्याबद्दल माहिती सांगताना म्हणाले, 1984 च्या सुमारास बसलेल्या अवस्थेतील महात्मा गांधी यांचा पुतळा बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या लोकनिर्माण विभागाच्या वतीने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात राम सुतार यांचं शिल्प निवडले गेले. संसद भवनात सध्या 16 पुतळे आहेत, त्यापैकी बहुतांश पुतळे राम सुतार यांनी घडवले आहेत. यामध्ये सरदार पटेल, भगत सिंह, छत्रपती शिवाजी महाराज, रणजित सिंह, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. अनेक ऐतिहासिक शिल्पे माझ्या वडिलांनी घडवल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाची नवीन संसद बांधण्यात येणार आहे. जुने संसदभवन आहे तसेच ठेवून त्याच्या शेजारी तब्बल 65 हजार चौरस मीटरवर संसदेची नवी आणि भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. 2022 साली म्हणजेच स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील त्यावेळी या नव्या संसदेचे लोकार्पण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.