मागील 67 वर्षांपासून आंघोळ न करणारा हा व्यक्ती आहे जगातील सर्वात घाणेरडा माणूस!


आपल्यापैकी सर्वच जण सकाळी उठल्यानंतर किंवा कामावरुन घरी परतल्यावर आंघोळ करण्याला प्रथम प्राधान्य देतात. शरीर स्वच्छ आणि मन आंघोळ केल्यानंतर ताजेतवाने होते. त्याचबरोबर कामाची ताजीतवानी सुरुवात होते. थंडीच्या दिवसात आंघोळ करणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे काही मंडळी एखाद्या दिवशी आंघोळीला दांडी मारतात. पण एकवेळेस त्यांचा हा आंघोळीचा आळस ठीक आहे. पण, गेल्या 67 वर्षांपासून एका 87 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने आंघोळच केली नसल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

अमो हाजी असे 67 वर्षांपासून आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींचे नाव असून ते इराणमध्ये राहतात. यासंदर्भातील वृत्त इराणमधील तेहरान टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हाजी यांना शरीर स्वच्छ केले तर आजारी पडू, अशी भीती असल्यामुळे त्यांना पाण्याचा तिटकारा आहे. त्यामुळे ते आराम करण्यासाठी अस्वच्छ आणि घाण वास येत असलेली जागा निवडतात.

आंघोळ न करण्याची हाजी यांना एकच विचित्र सवय नाही. ताजे अन्न खाण्यास त्यांना आवडत नाही. एवढेच नाही तर जनावरांचा मळ तंबाखू सारखा पाईपमध्ये भरून ओढायला त्यांना आवडते. दिवसातून पाच लीटर पाणी हाजी पितात. ते वाढलेले केस जाळून टाकतात. त्याचबरोबर एका हेल्मेटच्या मदतीने थंडीच्या दिवसात स्वत:चे शरीर गरम करण्याचा प्रयत्न करतात. या हेल्मेटचा उपयोग युद्धाच्या काळात केला जात असे.

हाजी यांना या सर्व विचित्र सवयी का लागल्या? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे ते संपूर्ण बदलले आणि या पद्धतीने जगू लागल्याची माहिती इराणमधील माध्यमांनी दिली आहे. आता हाजी त्यांच्या या घाणेरड्या आयुष्यात आनंदी आहेत. त्यांना जगातील सर्वात घाणेरडा माणूस असे देखील म्हटले जाते. त्याची त्यांना कोणताही फिकीर नाही.