सीरमच्या आगीत पाच जणांचा मृत्यू


पुणे – जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता बघता 3 मजल्यांचे नुकसान केले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

तत्पूर्वी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी या आगीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीमध्ये आग भडकल्याचे लक्षात आल्यानंतर सार्‍या व्यक्त केलेल्या काळजीचे आणि प्रार्थनेबद्दल धन्यवाद. आतापर्यंतची चांगली बाब म्हणजे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले होते.कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून केवळ काही मजले जळून खाक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर कोव्हिशिल्ड ही लस देखील सुरक्षित असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.


मीडीया रिपोर्ट्सनुसार, बीसीजीचे उत्पादन सीरमच्या मांजरी येथील प्लांटमध्ये होत होते. तर ही नवी इमारत असून येथे काही जण काम करत होते. त्या 3-4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान पुण्याचे पोलिस कमिशनर अमिताभ गुप्ता देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग नियंत्रणात येण्यास अजून तासाभराचा कालावधी लागू शकतो. सीरमच्या मांजरी प्लांटमध्ये सध्या कोणतीही निर्मिती सुरू नव्हती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सध्या संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. पण तरीही पुन्हा तपासणी सुरू आहे. तसेच लसीच्या प्लांट आणि स्टोरेजला कोणताही धोका नाही.

सध्या सीरमच्या मांजरी प्लांटमधील आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या परिसरातील काही लोकांनी आग लागल्यानंतर काही स्फोटांचे आवाज ऐकले आहेत. तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान सध्या तेथे एक एनडीआरएफची तुकडी तैनात आहे.