इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची माघार


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर टीम इंडिया उभी ठाकणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेने इंग्लडच्या भारत दौऱ्याला सुरूवात होणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने काही दिवसांपूर्वी त्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड नंतर केली जाणार आहे. पण भारतीय संघाला ही कसोटी मालिका सुरू होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे या मालिकेतून भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने माघार घेतली आहे.

निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर केलेल्या १८ जणांच्या संघात रविंद्र जाडेजाचा समावेश नव्हता. पण त्याच्या नावाच विचार त्यानंतरच्या दोन कसोटींसाठी केला जाणार होता. असे असताना जाडेजाला बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. विराट कोहलीचे या मालिकेसाठी पुनरागमन होत आहे. तो पालकत्व रजा संपवून पुन्हा संघात येणार आहे. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचेही दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन होत आहे. फिरकीपटू अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन या खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे.

असे आहे इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक-

  • ५ ते ९ फेब्रुवारी – पहिली कसोटी – चेन्नई
  • १३ ते १७ फेब्रुवारी – दुसरी कसोटी – चेन्नई
  • २४ ते २८ फेब्रुवारी – तिसरी कसोटी (दिवस/रात्र) – अहमदाबाद
  • ४ ते ८ मार्च – चौथी कसोटी – अहमदाबाद