सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


मुंबई : उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला दिलासा देण्यास नकार दिला असून मुंबई महापालिकेविरोधातील सोनू सूदची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोनू सूद विरोधात जी कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली आहे, ती योग्यच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जुहू येथील एका निवासी इमारतीममध्ये सोनू सूदने व्यावसायिक वापरासाठी बदल केले होता. महानगरपालिकेने त्यासाठी याआधी दोन वेळा बांधकाम तोडल्याची कारवाई केली होती. पण सोनू सूदने प्रत्येक कारवाईनंतर त्याच जागी पुन्हा नव्याने बांधकाम केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोनू सूद विरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. या सर्व कारवाई विरोधात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, सोनू सूदविरोधात कारवाई करण्याचा आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने सोनू सूदला जी नोटीस पाठवली होती, त्यापुढील कारवाई करण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे.