प्रवीण दरेकर यांचा वीज बिल वसुलीच्या मुद्यावरून पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा


मुंबई – विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कोरोना काळात हजारो, लाखोंची वीज बिले पाठवून झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल, तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा दिला आहे.

तसेच, दरेकर यांनी अगोदर महावितरणने तक्रारींचा निपटारा करताना किती ग्राहकांना, किती रकमेची वाढीव बिले कमी करुन दिली. याचा हिशेब जनतेला द्यावा, तोपर्यंत सक्तीची वसुली करता येणार नसल्याचे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा दिलेला एकतर्फी आदेश मागे घेतला जावा, अशी देखील मागणी केली आहे.

कोरोनाच्या काळातील वीजबिलांची थकबाकी प्रचंड वाढल्याने आता वसुलीची मोहीम सुरू करत पैसे न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे जाहीर केल्यानंतर त्याचा राजकीय पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे. भाजप, मनसे या विरोधकांबरोबरच महाविकास आघाडीचे समर्थक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील हिंमत असेल तर वीजजोडणी तोडून दाखवावी, असे आव्हान महावितरणला दिले आहे.


या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरीत खंडित करण्याचे एकतर्फी आदेश महावितरणने राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालयांना १९ जानेवारी २०२१ दिले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे निर्देश आपण महावितरणाला दिले होते. महावितरण कंपनीने थकाबाकी वसुलीचा निर्णय घेण्यापूर्वी सदरची थकबाकी ज्या कारणामुळे निर्माण झाली, याबाबतचा विचार व त्याचे निराकरण केलेले नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे.


तसेच, लॉकडाउनच्या काळात सरासरी मीटर वाचनानुसार ग्राहकांना देयके देण्यात आली. ज्या ग्राहकांना दर महिन्याला १ हजार रुपये बिल येत होते, त्यांना ५ ते १० हजार रुपयांची बिले पाठवण्यात आली. हा प्रकार म्हणजे कोरोना काळात सर्वसामान्यांची लूट करून कंपनीची भर करण्यासारखा होता. कोरोना काळात सरासरी मीटर वाचनानुसार पाठविलेल्या मोठ्या रकमांच्या बिलांच्या माध्यमातून व आता सक्तीने, दंडेलशाहीने वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन करण्यात येणाऱ्या वसुलीतून कंपनीपुरस्कृत एक मोठा वीज बिलांचा घोटाळा राज्यात घडत असल्याचे देखील दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे.