आहेरासाठी लग्नाच्या पत्रिकेत छापला चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड


चेन्नई : लोकांची जीवन जगण्याची पद्धत कोरोना महामारीमुळे पूर्णपणे बदलली आहे.लग्न सोहळ्यातही या महामारीमुळे मोठे बदल झाले आहेत. आता लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी नवविवाहित जोडप्यांचे कुटुंबिय वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी आता ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा आधार घेत आहेत. असाच एक अनोखा मार्ग तामिळनाडुच्या मदुरईमधील कुटुंबाने काढला आहे.

लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कृपया लग्नाला येताना कपड्यांचे किंवा भांड्यांचे आहेर आणू नका, असा मजकूर लिहिलेला दिसतो. पण कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेले नातेवाईकांना देखील वधू-वराला आहेर पाठवता यावेत यासाठी लग्नपत्रिकेवर चक्क गुगल पे आणि फोन पेचा क्यूआर कोड छापण्यात आला. रविवारी 17 जानेवारीला शिवशंकरी आणि सरवनन यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा त्यांच्या या अनोख्या लग्नपत्रिकेमुळे झाली. सोशल मिडीयात ही लग्नपत्रिका तुफान व्हायरल झाली.

वधूची आई टी. जेय जयंती हे मदुरईमध्ये ब्युटी पार्लर चालवतात. मुलीच्या लग्नात ही आगळीवेगळी परंपरा त्यांनी सुरु केली. त्यांची ही पद्धत सोशम मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, त्यांनी याचा कधी विचारही केला नसेल. त्याचबरोबर त्यांची ही पद्धत कामातही आली. अनेक पाहुण्यांनी-नातेवाईकांनी याचा वापरही केला. टी. जे. जयंती म्हणाल्या, आम्हाला खूप नातेवाईकांचे, मित्र-मैत्रीणींचे फोन आणि मॅसेजेस लग्नपत्रिका व्हायरल झाल्यापासून येत आहेत. लग्नाला येऊ न शकलेल्या तब्बल 30 हून अधिक नातेवाईकांनी क्यूआरकोडचा पर्याय निवडत वधू-वराला आहेर पाठवले आहेत. या आयडियाचे अनेकांनी कौतुक केले आहे.