नाणार बाधित जमिनीत मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने घेतले कमिशन; निलेश राणेंचा आरोप


मुंबई – भाजपचे नेते निलेश राणे यांनी कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे कमिशन घेतल्याचा खळबळजक आरोप निलेश राणे यांनी यांनी केला आहे.

शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यावर नाणार प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. पण आता पुन्हा एकदा कोकणातच नाणार प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. निलेश राणे यांनी यावरुनच ट्विट करत नाणार प्रकल्प शंभर टक्के कोकणातच पुन्हा एकदा आणला जाणार असा दावा केला आहे.


१०० टक्के नाणार प्रकल्प राजापूर तालुक्यात आहे तिथेच राहणार. खासदार विन्या राऊतला कोण विचारते?? मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने बाधित जमिनीमध्ये कमिशन घेतले आहे व खरेदी केलेली आहे म्हणून काही करून मुख्यमंत्री आहे त्याच जागेवर प्रकल्प ठेवणार…पडद्याआड सगळे ठरले असल्याचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. निलेश राणे यांच्या ट्विटने आता मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे.