खाद्यपदार्थ समजून खाल्ल्या Amazon वरील ‘शेणाच्या गोवऱ्या’ आणि दिला अजब फिडबॅक


मुंबई: ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण लॉकडाऊनमुळे वाढले आहे. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांकडून घरबसल्या अगदी अत्यावश्यक वस्तू ते घरातील पूजेच्या सामानापर्यंत अनेक गोष्टी मागवल्या जातात. त्या वस्तू वापरून झाल्यावर त्याच्या वेळोवेळी प्रतिक्रियाही दिल्या जात असतात. पण सध्या असाच एक अजब प्रकार अमेझॉनवर ऑर्डर करताना समोर आला आहे. धार्मिक विधींसाठी आवश्यक असणारी वस्तू एका व्यक्तीने अमेझॉनवरून ऑर्डर केली. आश्चर्यची गोष्ट म्हणजे ही वस्तू विधींमध्ये न वापरता त्याने ती चक्क खाल्ल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देखील अमेझॉनवर दिली आहे.

गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांना अनेक धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्व आहे. एका व्यक्तीने केकचा प्रकार समजून या शेणाच्या गोवऱ्या चक्क अमेझॉनवरून ऑर्डर केल्या. त्या गोवऱ्या आल्यानंतर त्याने धार्मिक विधीमध्ये वापरण्याऐवजी खाऊन पाहिल्या.आता शेणाच्या गोवऱ्या कुणी खाते का?असा लगेच प्रश्न तुमच्याही डोक्यात निर्माण झाला असेल. अहो या व्यक्तीने नुसत्या त्या शेणाच्या गोवऱ्या चाखून पाहिल्या नाहीत तर त्यावर प्रतिक्रिया देखील दिली. त्याचबरोबर गोवऱ्या तयार करणाऱ्या कंपनीला चार सल्ले देखील दिले.


याचा स्क्रिनशॉट डॉ. संजय अरोरा नावाच्या व्यक्तीने आपल्या अकाऊंटवर ट्विट केला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने काय सल्ला दिला हे देखील संजय अरोरा यांनी सांगितले आहे. हा आहे माझा भारत, I Love my Indiaअसे कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिले आहे.

खूपच वाईट कमेंट या व्यक्तीने केली आहे. मला ही वस्तू खाल्ल्यानंतर गवत खाल्ल्यासारखे वाटले. त्याव्यतिरिक्त त्याची चव मातीसारखी वाटली. कृपया पुढच्या वेळी देताना याची काळजी घ्या. तर अधिक कुरकुरीत आणि चविष्ट असेल याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. त्या व्यक्तीला हे खाल्ल्यानंतर जुलाबचा त्रास सुरू झाल्याचा उल्लेख त्याने आपल्या कमेंटमध्ये केला.

सध्याच्या घडीला डॉ. संजय अरोरा यांच्या पोस्टवर तुफान लाईक्स आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही जणांनी तर केक समजून त्याने गोवऱ्या मागवल्याचे देखील म्हटलं आहे. तर काही जणांच्या हे खरच असे घडले आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ट्विटरवर या पोस्टला 100 हून अधिक लोकांनी कमेंट्स तर साडेपाचशेहून अधिक युझर्सनी रिट्विट केले आहे.