कोरोना प्रतिबंधक लस बनविणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग


पुणे – कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हिशिल्ड’मुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली असून ही आग सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील याच ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन केले जात होते. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत असल्यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

एबीपी माझाशी बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्सिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी माहिती मिळताच दाखल झाले आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.