पुण्यातील या हॉटेलमध्ये ‘बुलेट थाळी’ खाल्यास मिळणार Royal Enfield Bullet


पुणे – कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे देशभरातील हॉटेल-रेस्टॉरंट नुकसानीत गेले होते. पण राज्य सरकारने लागू केलेल्या अनलॉकनंतर रेस्टॉरंट पुन्हा सुरू झाले आहेत, पण अद्यापही हवा तसा प्रतिसाद ग्राहकांचा मिळत नसल्याने पुण्यातील एका रेस्टॉरंट मालकाने भन्नाट शक्कल लढवली असून कोरोना काळात धंदा होत नसल्यामुळे वडगाव-मावळमधील शिवराज रेस्टॉरंटचे मालक अतूल वायकर हे देखील त्रस्त होते. कोरोनामुळे ग्राहक फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि रोजचा खर्चही निघत नव्हता, अशात एक ‘बुलेट आयडिया’ वायकर यांच्या डोक्यात आली.
https://reviews.trekbook.in/wp-content/uploads/2020/10/Bullet-Thali-Challenge-1280×720.jpg
त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट ऑफर आणली. जो कोणी जेवणाची स्पेशल ‘बुलेट थाळी’ पूर्ण फस्त करेल त्याला 1.65 लाख रुपयांची चकाकती नवीकोरी बुलेट गिफ्ट म्हणून दिली जाईल अशी ऑफर त्यांनी आणली. स्पेशल बुलेट थाळी खाण्यासाठी काही अटी त्यांनी ठेवल्या आहेत. मुख्य म्हणजे एकाच व्यक्तीला ही थाळी खावी लागेल. तसेच पूर्ण थाळी संपवण्यासाठी त्याला एक तासाचा वेळ मिळेल.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वायकर यांनी रेस्टॉरंट बाहेरच ५ नव्या बुलेट उभ्या केल्या आहेत. बाहेर उभ्या असलेल्या बुलेट बघून अनेकजण या हॉटेलमध्ये स्पेशल थाळी संपवून बुलेट जिंकण्यासाठी येतात, पण थाळीत एवढे पदार्थ असतात की खाता खाता त्यांना घाम फुटतो. द बुलेट थाळी एक नॉन-व्हेज थाळी आहे. यामध्ये 4 किलो मटण आणि फ्राय मच्छीचे जवळपास १२ पदार्थ असतात. ही थाळी बनवण्यासाठी 55 कर्मचारी काम करतात. यामध्ये फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला आणि कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ असतात. ऑफर आणल्यापासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे, तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केले जाते. दिवसाला ६५ थाळी संपतात, असे वायकर सांगतात.
https://reviews.trekbook.in/wp-content/uploads/2020/10/Bullet-Thali-Challenge.jpg
यापूर्वीही शिवराज हॉटेलने अशीच एक स्पर्धा ठेवली होती. यामध्ये चार लोकांनी मिळून एका तासात आठ किलो रावण थाळी खाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी विजेत्याला 5000 रुपये रोख देण्यात आले तसेच थाळीचे पैसेही त्याच्याकडून आकारण्यात आले नाही. तर, बुलेट थाळी स्पर्धा सुरू झाल्यापासून ही महाकाय थाळी फक्त एकच व्यक्ती एका तासात पूर्ण खाण्यात यशस्वी ठरला आहे. ही बुलेट थाळी सोलापूरच्या सोमनाथ पवार यांनी एका तासात फस्त केली. त्या बदल्यात त्यांना लगेचच एक बुलेट गिफ्ट म्हणून देण्यात आल्याची माहिती अतुल वायकर यांनी इंडिया टुडेला दिली. दरम्यान, सोशल मीडियामध्ये ‘बुलेट थाळी’ची चर्चा सुरू झाल्यापासून बुलेट जिंकण्यासाठी शिवराज हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.