तेलंगणातील आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यु


तेलंगणा – तेलंगणामधील कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले असून कोरोना लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. शवविच्छेदनासाठी आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही.

याबाबत तेलंगणामधील सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोग्य कर्मचाऱ्याला १९ जानेवारी रोजी लस देण्यात आली होती. त्याच्या छातीत दुसऱ्या दिवशी दुखू लागले होते. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.

प्राथमिकदृष्ट्या कोरोना लसीकरणाशी संबंधित हा मृत्यू नसल्याचे दिसत आहे. गाईडलाइन्सनुसार, शवविच्छेदन डॉक्टरांच्या टीमकडून केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण विभागाने निवदेन प्रसिद्ध करत दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही दोन्ही वेळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळली होती. १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली असून एकूण तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जाणार आहे.

मुरादाबाद येथील सरकारी रुग्णालयात पहिला मृत्यू झाला होता. वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षीय महिपाल सिंह यांचा लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या प्रकरणात कर्नाटकमधील बेल्लारी येथील राज्याच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या ४३ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना लस देण्यात आली होती.