आता कर्नाटकातही भाजपचे १५ आमदार बंडाळीच्या पावित्र्यात


बंगळुरु – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची डोकेदुखी मंत्रिमंडळ विस्तारामुळे वाढण्याची शक्यता आहे. येडियुरप्पा यांना या विस्तारामुळे पक्षातील आमदाराच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यातच येडियुरप्पा सरकारविरोधात १५ आमदार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज झालेले आमदार एकमेकांच्या संपर्कात असून, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचं वृत्त आहे.

१३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. ७ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी देण्यात आली. पण भाजपाच्याच आमदारांनी या विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. जे लोक सातत्याने सत्तेत आहेत, त्यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्या चुकीच्या आहेत.

सरकारविरोधात बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले भाजपाचे १५ आमदार दिल्लीला जाण्याची योजना आखत असल्याची जोरदार चर्चा आहे. वरिष्ठ मंत्र्यांना आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावं आणि नव्या चेहऱ्यांना राज्य सरकारने संधी द्यावी. पुढील दशकभर हे नवीन चेहरे पक्षाची बांधणी करण्याचे काम करू शकतात. भाजप आमदार शिवानगौडा नायक मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना म्हणाले, २० महिन्यांपासून जे मंत्री मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आता बाजूला करावे आणि नवीन चेहऱ्यांना घेण्यात यावे. पक्षासाठी वरिष्ठ मंत्र्यांनीही काम करायला हवे आणि २०२३च्या निवडणुकीसाठी रणनिती तयार करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. नाराज भाजप आमदार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांकडून भेटीसाठी वेळ मागण्यात आल्याचेही वृत्त असून, राष्ट्रीय नेतृत्व या आमदारांच्या मागण्यांची दखल घेणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.