अखेर संभाजी बिडीच्या नावात बदल


पुणे : चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला होता. अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी प्रयत्न करत होते. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या मागणीबाबत आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे.

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे आणि कंपनीने घेतला होता. परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल, असे त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले होते. कंपनीने आता बिडीचे नाव बदलल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते.

मागील अकरा-बारा वर्षापासूनच्या संभाजी बिडी नावाविरोधातील लढ्याला अखेर यश आले आहे. महापुरुषांच्या नावाचा यापुढे कोणीही गैरवापर करू नये, तसे केल्यास संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिला आहे. अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरले जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. कोल्हापुरातही गेल्या वर्षी संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळाले होते. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. पण नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. आता अखेर बिडीचे नाव बदलण्यात आले आहे.

आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव साबळे वाघिरे आणि कंपनी कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे, असे काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. कंपनीने म्हटले होते की, नाव बदलण्यास थोडा वेळ दिला जावा, जेणेकरुन नवं नाव नोंदवता येईल, नवे नाव लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तसेच आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही, शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर कुऱ्हाडही येणार नाही.