आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी देशातील ‘या’ बड्या कंपन्यांची लस खरेदीसाठी हालचाली सुरु


नवी दिल्ली – आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी भारतातील अनेक बड्या कंपन्यांनी दर्शवली आहे. अनेक कंपन्यांनी त्यापद्धतीचे नियजोनही सुरु केल्याचे वृत्त आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये चालवली जात असून पहिल्या फेरीत आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्धांना लस दिली जात आहे. असे असतानाच स्टील उत्पानद श्रेत्रातील अग्रेसर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड, त्याचबरोबर महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लसीची सरकारकडून प्राथामिक स्तरावर मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. या बड्या कंपन्या त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेतील, असे सांगितले जात आहे. रॉयटर्स आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आयटीसीच्या कॉर्पोरेट ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या अभिताव मुखर्जी यांनी, आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आम्हाला करायचे आहे. आम्ही यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असून सध्या आमच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी भारत सरकारने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

टाटा स्टीलने दिलेल्या माहितीनुसार व्यवसायिक पद्धतीने बाजारपेठेत कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल. जगभरामध्ये मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाउननंतर आता कारखाने आणि उद्योग व्यवसाय हळूहळू सुरळीत होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लोकांच्या मोठ्या संख्येने नोकऱ्या गेल्या होत्या. अनेकजण आपल्या मूळ गावी परतले होते. याचा फटका कंपन्यांनाही बसला होता.

जेएसपीएलचे ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या पंकज लोचन यांनीही मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करणाऱ्या लसनिर्मात्या कंपनीच्या आम्ही संपर्कात असल्याची माहिती दिली. सर्व कोरोनायोद्धांचे लसीकरण झाल्यानंतर बाजारपेठेत लस उपलब्ध होईल, तेव्हा आम्ही ती आमच्या कर्मचाऱ्यांसाठी घेऊ इच्छितो, असेही लोचन यांनी सांगितले. पण कोरोनाच्या लसी किती संख्येने विकत घेणार आहेत किंवा कोणत्या कंपनीच्या लसी विकत घेणार आहेत, यासंदर्भात लोचन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

आम्ही आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेऊ इच्छितो, असे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रांनाही सांगितले आहे. आम्ही यासंदर्भातील निर्णय सरकारने ठरवलेल्या धोरणांनुसारच घेऊ असेही महिंद्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घेणार असल्याचे हिंदुस्तान युनिलिव्हरनेही सांगितले आहे. एकीकडे सरकारने कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत असतानाच दुसरीकडे अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या विचारात आहे. मात्र त्याचवेळी जगातील अनेक बड्या कंपन्या यासंदर्भात पुढाकार घेताना दिसत नाही.