ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार ११३ जागा जिंकत शिवसेना अव्वलस्थानी


मुंबई – काल राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत सर्वाधिक जागा आपणच जिंकल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत होता. अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले असून, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेने मैदान मारले आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून, काँग्रेसच्या जागांपेक्षा विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.

पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व तसाच दावा या वेळीही सर्वपक्षीयांनी केला होता. भाजपा व महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात आला होता. अखेर निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

१२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत ३ हजार ११३ जागा शिवसेनेनं जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. तर २ हजार ६३२ जागा भाजपने जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २४०० जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनेही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

काँग्रेस व भाजप या दोघांनाही विदर्भात यश मिळाले. महाविकास आघाडीचा मराठवाडय़ात वरचष्मा राहिला. कोकणात रत्नागिरीमध्ये शिवसेना तर सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. उत्तर महाराष्ट्रात राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळाले. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल. सरपंचपदाचे आरक्षणही अद्याप जाहीर न झाल्यामुळे प्रत्येकाने सरपंचपद मिळविण्याच्या उद्देशाने ताकद लावली होती. निकालानंतर सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच सर्वच नेतेमंडळींनी सरपंचपद आपल्या गटाला मिळावे म्हणून जुळवाजुळव सुरू केली. विशेषत: बहुमत नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नव्या सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.