साक्षी महाराजांकडून ओवैसी यांचा “गंदा जानवर” असा उल्लेख


उन्नाव – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी भाजप खासदार साक्षी महाराज हे लोकप्रिय असून ते पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर साक्षी महाराज यांनी जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. पण भाजप खासदाराची जीभ यावेळी ओवैसीबाबत बोलताना घसरली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ओवैसी यांचा “गंदा जानवर” असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्या सारख्या लोकांना देशातील जनता चांगलीच ओळखून असल्याचे म्हटले आहे. आता साक्षी महाराजांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका कार्यक्रमात साक्षी महाराज सहभागी झाले होते. त्यांनी येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते असदुद्दीन ओवैसींवर टीकास्त्र सोडले. तसेच अयोध्येत राम मंदिरावर वक्तव्य करणारे ओवैसी हैदराबादचे घाणेरडे जनावर आहेत. मंदिराचे निर्माण सर्वांच्या सहकार्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात होत आहे. रक्ताचे पाट वाहण्याची भाषा ओवैसी करत होते. पण मोदीजींच्या शासनकाळात रक्ताचा एकही थेंब न सांडता शांतीपूर्ण पद्धतीने मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

देशाची जनता आता ओवैसींसारख्या लोकांना चांगलीच ओळखू लागली आहे. आता त्यांच्या जाळ्यात कोणीच फसणार नाही. दोन्ही वर्गाचे लोक अयोध्येत मंदिर निर्माणासाठी शांततेत काम करत आहेत हेच त्यामागचे कारण असल्याचेही साक्षी महाराज यांनी कार्यक्रमात म्हटले आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालकडे ओवैसींनी आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच उत्तर प्रदेशचा ओवैसी यांनी दौरा केला. तसेच आपल्या समर्थकांची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची त्यांनी बैठकही घेतली. साक्षी महाराज यांनी यादरम्यान एक मोठे वक्तव्य केले होते. बिहारमध्ये ओवैसी यांनी भाजपची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसेच होईल, असे ते म्हणाले होते.

देव त्यांना ताकद देवो, त्यांची साथ देवो, बिहारमध्ये आम्हाला त्यांनी मदत केली होती. आता ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मदत करतील, असे वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे. मुस्लिमांचाही विश्वास आम्ही मिळवत आहोत. गेल्या 65 वर्षांपासून भारतातील मुस्लिमांना तुष्टीकरणाच्या नावाखाली घाबरवण्यात आले. परंतु आज मुस्लिमांना आपले हित जाणणारा पक्ष हा भाजप असल्याचे समजून आले आहे. भाजपशी मोठ्या संख्येने मुस्लीम वर्गही जोडला जात असल्याचेही ते म्हणाले होते.