मुंबईच्या महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली राज ठाकरेंची भेट


मुंबई – शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागवल्या. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी सायंकाळी रोजी सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

त्यांनी कृष्णकुंजवरील सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी 9.45 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मलबारहिल येथील सागर बंगल्यावर जाऊन महापौरांनी भेट घेऊन त्यांना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येत आहेत. मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, त्यावेळी हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर, तब्बल एका वर्षाने तेही बाळासाहेबांच्या निमित्तानेच उद्धव-राज एकत्र येत असल्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना लागली आहे.