सोशल मीडियावर केला जात आहे सवाई भट्टने गरिबीचे नाटक केल्याचा दावा


सध्या ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन रंगात आला असून हा शो नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हे तिघे लोकप्रिय परिक्षक आणि आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे एकापेक्षा एक भारी स्पर्धक यामुळे चर्चेत आहेत. त्यातच राजस्थानातून आलेला गोड गळ्याच्या सवाई भट्टची तर भलतीच चर्चा आहे. तूर्तास हाच सवाई भट्ट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सवाई भट्टने गरिबीचे नाटक केल्याचा दावा केला जात आहे.

सवाईने आपली गरिबीची कहाणी ‘इंडियन आयडल 12’च्या ऑडिशनदरम्यान ऐकवली होती. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवून मिळणा-या पैशातून घर चालवत असल्याचा आणि अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याचे त्याने सांगितले होते. सगळ्यांचेच डोळे त्याची ती कहाणी ऐकून पाणावले होते. याच सवाई भट्टचे काही जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि त्यावरून त्याच्या गरिबीच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सवाई स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. तो अनेक ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाताना दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटक-यांनी सवाई प्रोफेशनल सिंगर असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर त्याने संगीताचे प्रशिक्षण घेतल्याचाही दावा केला जात आहे. पण ऑडिशनमध्ये आपण फक्त एक लोककलाकार असल्याचा दावा सवाईने केला होता.

सोशल मीडियात सवाईचे हे फोटो व्हायरल होताच नेटक-यांनी ‘इंडियन आयडल’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सवाई आणि ‘इंडियन आयडल ’च्या मेकर्सनी खोटे बोलून प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध गायक सोनू निगमने एकेकाळी भारतीय रिअ‍ॅलिटी शोची पोलखोल केली होती. सोनू त्यावेळी खरे बोलला होता, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

सध्या अख्ख्या देशाला सवाईच्या आवाजाने वेड लावले आहे. त्याचे काहीच दिवसांत असंख्य चाहते बनले आहेत. मात्र त्याच्या या फोटोवरून लोकांचा विश्वास डगमगला आहे. याबाबत अद्याप ‘इंडियन आयडल 12’ने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.