कोव्हॅक्सिन लसीसंदर्भातील फॅक्टशीट भारत बायोटेकने केली जारी


नवी दिल्ली – ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आपातकालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन या लसीला परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता कोव्हॅक्सिन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचे भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी म्हटले होते. लस बनवण्याचा आम्हाला अनुभव असून सर्व वैज्ञानिकांचे सल्ले आम्ही गांभीर्याने घेतो, असेही कृष्णा म्हणाले होते. कृष्णा यांनी कोव्हॅक्सिनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर सध्या त्यांनी कोव्हॅक्सिन घेऊ नये असे सांगितले आहे. कोव्हॅक्सिन संदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी भारत बायोटेकने जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

सरकारने यापूर्वी इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणाऱ्या व्यक्तींनाही कोव्हॅक्सिने घेता येईल, असे म्हटले होते. पण चाचण्यांदरम्यान कोरोनाची लस अशा व्यक्तींवर फारशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार रक्ताशी संबंधित आजार ज्या लोकांना आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे अशांनी कोव्हॅक्सिन घेऊ नये, असे म्हटले आहे. जे सध्या आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनीही कोव्हॅक्सिन घेऊ नये, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमातून यापूर्वीच गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच नवजात बालकांच्या मातांनाही वगळले आहे.

भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसून आली तर त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्यावी, असा सल्लाही दिला आहे. कंपनीकडून आरटी-पीसीआर चाचणीच्या निकालांनाही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. हे सल्ले आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिले असल्याचेही भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणानंतरही कोणामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर ती खूप सौम्य असतात. कोणत्याही प्रकाराची अ‍ॅलर्जी कोव्हॅक्सिनमुळे होत नाही. अशी अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. खूपच दुर्मिळ प्रकरणांमध्ये असे होत असल्याचेही भारत बायोटेकने म्हटले आहे.

कंपनीने जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये, तुम्हाला कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर काही तासांनंतर काही साईड इफेक्ट दिसले किंवा कोरोनासारखी लक्षणे आढळून आली तर तुम्हाला ज्या व्यक्तीने लस दिली, त्याला यासंदर्भातील माहिती द्या. तुम्ही कोरोनाची लस घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर काही औषधे घेत असाल तर त्याचीही स्पष्ट आणि योग्य माहिती द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनापासून वाचण्यासाठी आतापर्यंत पालन करत आलेल्या नियमांचे पालन करु नये, असा लसीकरणाचा अर्थ होत नसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. कोरोनाची लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि फॉर्म देण्यात येतो. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये प्रतिकूल परिणाम दिसल्यास त्याने सात दिवसांच्या आत तो फॉर्म भरुन जमा करणे अपेक्षित आहे.

भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनेचे ५५ लाख डोस भारत सरकारने खरेदी केले आहेत. कोरोनाची लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा भारत बायोटेकने केली आहे. एका सहमती पत्रावर कोरोनाची लस देण्यात येणाऱ्या व्यक्तीला स्वाक्षरी करावी लागणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. लसीचे काही विपरित परिणाम झाल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात येईल. लस देण्यात आल्यानंतर कोणालाही काही त्रास झाल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयामध्ये सोय उपलब्ध करुन दिली जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

कोव्हॅक्सिनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायर्समध्ये अ‍ॅण्टीडोट्स निर्माण करण्याची क्षमता दिसून आली. लस निर्माण करणाऱ्या कंपनीने लसीच्या क्लिनिकल क्षमतेसंदर्भातील निकाल अद्याप समोर येणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या आकडेवारीचा अभ्यास केला जात आहे.