‘अंजिक्य’ भारत! चौथ्या कसोटीसह भारताचा मालिका विजय


ब्रिस्बेन : भारताने चौथ्या कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. भारताने या विजयासाह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहाणीकारक पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत कसोटी मालिकेवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ गडी राखत विजय मिळवला. तर तिसरा कसोटी सामना हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत अनिर्णित राखला. भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर विजय मिळवला.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ३२८ धावांचं आव्हान पार केले.

कसोटीच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी ९ बळी घेत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मागील ३२ वर्षांपासन या मैदानावर ‘अजिंक्य’ असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने पराभवाची चव चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघाने नवीन विक्रम रचला आहे. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. हा विक्रम भारतीय संघाने मोडीत काढला.