मालिका विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचे कौतुक


नवी दिल्ली – शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिसहासिक विजयाची नोंद करत मालिका २-१ ने खिशात घातली. भारतीय संघाने अनेक आव्हानांचा सामना करत मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत आपला आनंद व्यक्त करत भारतीय संघाचे कौतूक करत अभिनंदन केले आहे.

भारताने ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत नाबाद ८५ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने या विजयासाह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. मालिका विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयामुळे आपण खूप खूश आहोत. भारतीय संघाची ऊर्जा आणि विजयाचे वेड दिसून येते. त्याचबरोबर त्यांचा दृढ निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन. भविष्यातील प्रयत्नांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा, असे म्हणत मोदींनी आनंद व्यक्त केला.