ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने दिले टीम इंडियाला भन्नाट गिफ्ट


नवी दिल्ली – भारताने ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५ नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चौथ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. भारताने या विजयासह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. भारतीय संघावर या विजयानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच विजयश्री खेचून आणण्याऱ्या भारतीय संघाचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अभिनंदन करतानाच त्यांना एक भन्नाट गिफ्टही दिले आहे. यासंदर्भातील घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच केली आहे.


गांगुली यांनी सामना संपल्यानंतर ट्विटरवरुन भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी एक मोठी घोषणाही केली आहे. हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशाप्रकारे मालिका विजय मिळवणे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवले जाईल, अशा शब्दांमध्ये भारतीय संघाच्या विजयानंतर गांगुली यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुढे त्यांनी, बीसीसीआयकडून भारतीय टीमला पाच कोटींचा बोनस जाहीर केला आहे. खर तर या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. सर्व सदस्य खूप छान खेळले. अभिनंदन, असेही म्हटले आहे.


ट्विटरवरुन भारतीय संघाचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही कौतुक केले आहे. असे काही क्षण भारतीय क्रिकेटसाठी खूप खास असतात, असे म्हणत जय शहा यांनी बीसीसीआयकडून भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.