कोरोना लस घेतलेल्या उत्तर प्रदेशातील त्या वॉर्डबॉयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे


मुरादाबाद (उत्तर प्रदेश) – १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मुरादाबात जिल्ह्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा लसीकरणानंतर रविवारी तब्येत बिघडून मृत्यू झाला होता. कोरोनाची लस त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. पण आता या वॉर्डबॉयच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा पोस्टमार्टेम रिपोर्टमधून झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या वॉर्डबॉयचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या ४६ वर्षीय वॉर्डबॉयचे नाव महिपाल सिंह असे असून, १६ जानेवारी रोजी कोरोनावरील लस त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला होता. महिपाल सिंह यांचा मृत्यू कोरोनावरील लसीमुळे झाल्याचा दावा त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, मुख्य आरोग्य अधिकारी एमसी गर्ग यांनी हे आरोप फेटाळताना महिपाल यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण हे हृदयविकार असल्याचे म्हटले आहे.

महिपाल सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांनीही सांगितले. तसेच महिपाल यांच्या मृत्यूनंतर लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी ताकीद यांनी दिली आहे. कोरोनाची लस महिपाल यांना देण्यात आली होती. त्यानंतर ते घरी गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, लस देण्यापूर्वी महिपाल यांची वैद्यकीय चाचणीही केली गेली नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत सीएमओने सांगितले की, लसीकरण अभियानामध्ये मुरादाबादमध्ये ४७९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.