राणे कुटुंबियांना शिवसेनेचा दे धक्का; तीन पैकी दोन जागी फडकला भगवा


कणकवली – शुक्रवारी राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. आजच्या मतमोजणीमध्ये एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. राणे कुटुंबाला कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून शिवसेनेने पाहिला धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे.

सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि नितेश राणे यांना धक्का देत शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेने या सर्व सदस्यांवर दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे.

मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली, तेव्हा कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली तालुक्यामधील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. आमदार नितेश राणेंचा कणकवली हा गड मानला जातो, त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेले राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत कणकवलीमध्ये आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात.