
कोल्हापूर – शुक्रवारी राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. आजच्या मतमोजणीमध्ये एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आता या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. पण शिवसेनेने चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून जबरदस्त कामगिरी केली आहे. शिवसेनेने प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर भगवा फडकवला आहे. तीनही पक्षांमधील स्थानिक नेते शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. पण यामधूनही शिवसेनेने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेने फडकवला भगवा
साऱ्या राज्यात कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी चर्चेत होती. या आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पण शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी या आघाडीवरही मात करुन विजयश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळाले होते.
