धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये – अमोल मिटकरी


सांगली : आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी इस्लामपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये. आम्ही बोलायला लागलो, तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा नाव न घेता भाजपला दिला.

आमदार अमोल मिटकरी राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, प्रतीकदादा पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, शरद लाड, मनोज शिंदे, अविनाश पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

बापूंनी ज्ञान गंगा खेडय़ा-पाडय़ात नेली. लोक संपर्काचे प्रभावी साधन म्हणून पदयात्रा काढल्या. त्यांनी मोठा विरोध असतानाही १४ महिन्यांत साखर कारखाना उभा करून तालुक्याचे नंदनवन बनविले आहे. त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खाते पुस्तिकेचे प्रणेते बापू असल्याचे आ. मिटकरी म्हणाले.

गावागावात लोक रामराम करून परस्पराबाबत आदर व्यक्त करतात. पण काही लोक श्रीराम नारा देत दहशत कशाला माजवत असल्याचा सवाल करून ते म्हणाले, स्व. बापूंनी कारखाना कार्यस्थळावर राम मंदिर बांधून सर्व समावेशक रामाचा संदेश दिला आहे. हनीट्रॅपचा प्रयोग सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्यावर झाला आहे. पण कोणीही याचेच भांडवल करून राजकारण करू नये, आमच्याकडेही कुंडल्या आहेत. वेळ आली तर त्याचाही उलगडा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.