‘या’ तारखेला रिलीज होणार कंगनाचा धाकड !


लवकरच कंगना राणावतचा धाकड चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या कंगना व्यस्त आहे आणि यादरम्यान तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत आहेत. कंगनाने हे पोस्टर शेअर करताना लिहिले की, निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.

सध्या भोपाळमध्ये आपल्या आगामी धाकड चित्रपटाचे कंगना शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. एका राजकीय गटाने भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.


काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कंगनाने भेट घेतली होती. कंगनाने यापूर्वी पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलैवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलैवी चित्रपट 26 जून 2020ला रिलीज होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.