…अखेर मनसेचे इंजिन यवतमाळमध्ये धावले


यवतमाळ: ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले असून मनसेला यवतमाळमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

याशिवाय, मनसेने राज्याच्या इतर भागांमध्येही खाते उघडले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी गावात मनसेने शिवसेना-भाजप युतीला धूळ चारत विजय मिळवला आहे. अमरावती जिल्ह्यातील खैरी सावंगी वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेने एकहाती विजय मिळवला आहे. या ठिकाणी पक्षाने ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

मनसेने सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर विजय मिळवला. मनसेचे 9 सदस्य अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये विजयी झाले. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी झाले आहेत. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय झाला आहे.