पुण्यातील मुळशीत सापडला बर्ड फ्लूचा विषाणू, 5 हजार कोंबड्यांची विल्हेवाट


पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील बर्ड फ्लूचा पहिला विषाणू आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने काल संध्याकाळपर्यंत तिथल्या पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट पशू संवर्धन विभागाकडून करण्यात आल्याची माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन काळे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागल्यामुळे तेथील पोल्ट्री मालकाने चार दिवसांपूर्वी मृत कोंबड्यांची पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लूचा विषाणू नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी काही नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठवण्यात आला. त्याचा अहवाल काल (शुक्रवार) उशिरा प्राप्त झाला. या पोल्ट्रीतील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.

बर्ड फ्लूचा रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावली. नांदे येथील शिंदेवस्तीवरील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.