धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया


पुणे : राज्यातील राजकीय वर्तुळात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. हे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे मत व्यक्त करत पक्षप्रमुख म्हणून यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा जाहीर केली आहे. पण मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आग्रही भूमिकेत आहे. आता धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे आमदार रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु असल्यामुळे या प्रकरणावर आता काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण तरीदेखील हे प्रकरण बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याची माहिती समोर येत आहे. पण धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. हा माणूस जर खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असे म्हणत एकप्रकारे धनंजय मुंडे यांचे समर्थन देखील रोहित पवार यांनी यावेळी केले आहे.