एनबीईकडून नीट पीजी परीक्षांच्या तारखांची घोषणा


नवी दिल्ली – National Eligibility cum Entrance Test म्हणजेच नीट पीजी 2021 परीक्षांची तारीख द नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (एनबीई) जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा यंदा 18 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. दरम्यान परीक्षार्थ्यांना याबाबतचे अधिकृत परिपत्रक एनबीईच्या अधिकृत संकेतस्थळ natboard.edu.in या ठिकाणी पाहता येईल.

कम्युटर बेस्ड मोडमध्ये होणारी ही परीक्षा यंदा 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नीट पीजी 2021 परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला 30 जून 2021 पर्यंत किंवा त्याआधी इंटर्नशीप पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबत इतर पात्रता निष्कर्ष देखील तपासून पाहणं आवश्यक आहे.

दरम्यान एनबीईने यंदा विद्यार्थ्यांना वेळोवेळी nbe.edu.in आणि natboard.edu.in या संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले आहे. याद्वारा नीट पीजी बुलेटीन आणि नीट पीजी 2021 अ‍ॅप्लिकेशन याची माहिती मिळणार आहे. एनबीईने यंदा सविस्तर नोटिफिकेशन जाहीर केले नसले तरीही मागील वर्षीच्या नीट पीजी परीक्षा पॅटर्न नुसार, विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरे जायचे असल्यास त्यांच्या प्रोव्हिजनल किंवा परमनंट एमबीबीएस डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 30 जूनपूर्वी त्यांनी एका वर्षाचा इंटर्नशीपचा काळ पूर्ण केलेला असावा.